Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे नगरसेवकांचा सत्कार
VileParle News

लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे नगरसेवकांचा सत्कार

nagarasevakancha satkarलोकमान्य सेवा संघ संस्थेतर्फे विलेपार्ले (पूर्व) विभागातील नवनिर्वाचित नगरसेवक सौ. ज्योती अळवणी व श्री. अभिजीत सामंत यांचा सत्कार बुधवार दि. १५ मार्च रोजी, संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद चितळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सत्कार समारंभास विलेपार्ल्यातील मान्यवर आणि नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावली.
नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सत्कार हा काही नविन गोष्ट नाही, मग या सत्कार समारंभाचे वैशिष्ठय काय होते? त्यामागची संकल्पना काय होती? लोकमान्य सेवा संघ नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्यात अग्रेसर असतो. संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे अभिनव असे “इ कचरा” गोळा करण्याचे केंद्र चालवले जाते. या उपक्रमास केवळ विलेपार्लेच नव्हे तर इतर उपनगरातूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे निनिराळ्या गृहसंकुलाशी संपर्क साधून, घरोघरीची रद्दी गोळा केली जाते. ही रद्दी विकून जमा झालेल्या रकमेचा विनियोग कॅसरग्रस्तांसाठी केला जातो.

हे सर्व उपक्रम बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या सहभागाने चालवले जातात, ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे. तर अशा या नागरिक दक्षता शाखेने मुंबई मनपा निवडणूकीपुर्वी निवडणूकीस उभे राहिलेले उमेदवार आणि पार्लेकर यांची एक संयुक्त सभा आयोजित केली होती. ही सभा म्हणजे उमेदवारांची भाषणबाजी नव्हती, तर नागरिकांच्या समस्या, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, मतदारांकडूनच इच्छुक उमेदवारांना समजावेत अश्या स्वरूपाचा कार्यक्रम होता. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार समारंभ ही निवडणुकीपूर्वी झालेल्या कार्यक्रमाचीच परिणीती होती असे म्हणावे लागेल.

पाहुण्यांचे स्वागत करतांना संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद चितळे यांनी ‘ शुभेच्छा दिल्यानंतर अपेक्षा येतात ’ असे मार्मिक विधान करून नविन नगरसेवकांनी काय काम करावे याबद्दल विचार व्यक्त केले. नगरसेवकांनी समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी विलेपार्ले येथील सर्व गृहसंकुलाच्या (Housing Societies) संपर्कात रहावे असे सांगितले.

त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. दिपक घैसास यांनी नव्या मनूला अनुसरून, नागरिक आणि नगरसेवक यांच्या एकमेकांच्या संपर्कासाठी एखादे App बनवावे अशी मौलिक सूचना केली. तसेच पार्ल्यामध्ये जेष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढत असल्याने रस्त्यांच्या सुधारणांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे जेणेकरून पार्लेकर खाली मान घालून न चालता ताठ मानेने चालतील.

सौ. ज्योती अळवणी यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की महिला आपल्या घराकडे प्रथम लक्ष देतात, त्यानुसार पार्ले हे माझेच घर असल्यामुळे मी नक्कीच त्याची काळजी घेईन. त्या पुढे म्हणाल्या की नागरिकांना वाटते आपले प्रश्न सुटत नाहीत, परंतु तसे नसते. प्रश्न सोडवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करावा लागतो. तसेच काही प्रश्न हे पोलिसांच्या अखत्यारींतील असतात. तर अनेक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य आवश्यक असते, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.

श्री. अभिजीत सामंत यांनी, नगरसेवक आणि नागरिक यांत दुरावा नसावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि ज्या गोष्टी बोललो त्या करून दाखवू असे ठासून सांगितले.

या सत्कार समारंभास पार्ल्याचे लोकप्रिय आमदार श्री. पराग अळवणी हे सुद्धा उपस्थित होते. नगरसेवकांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी लोकमान्य सेवा संघाचे आभार मानले. दोन्ही नगरसेवकांना त्यांनी सांगितले की नगरसेवक झाल्यानंतर भरपूर मेहनत घ्यावी लागते.

तसेच यशस्वी नगरसेवक होण्यासाठी महापालिका अर्थसंकल्पाची जाण असावी लागते असा गुरुमंत्र त्यांनी दिला. नागरी समस्या ह्या पूर्णपणे कधीच संपत नाहीत. तरीही नागरिकांच्या सहकार्याने उत्तम काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
निवडणुकीपूर्वी नागरिक दक्षता शाखेतर्फे लोकमान्य सेवा संघात झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची जंत्रीच एका पुस्तिके द्वारे ह्या कार्यक्रमाआधी काही दिवस नगरसेवकांना देण्यात आली होती. यात पार्ले (पूर्व) शहराची प्रत्यक्ष परिस्थती दर्शवणारी विविध छायाचित्रेही छापली होती. या पुस्तिकेत एक ‘ प्रगतीपुस्तकही ’ छापले आहे. दोन्ही नगरसेवकांनी हे प्रगतीपुस्तक भरावे व वेळोवेळी पार्लेकरांशी संवाद साधावा अशी अपेक्षा आहे.
दोन्ही नगरसेवक, आमदार आणि उपस्थित पार्लेकारांनी एकमेकांच्या सहकार्याने, पार्ले नगरी ही नागरी समस्या सोडवण्यात सर्व मुंबईकरांना आदर्श ठरेल अशी करु असा संकल्प सोडला.

शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात शिवरायाच्या राज्याभिषेक वर्णनपर गीताने झाली तर शेवट राष्ट्रगीताने झाला.


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla