Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
शरद ऋतूतील आरोग्यदायी आहार
Health Articles

शरद ऋतूतील आरोग्यदायी आहार

ayurvedप्रत्येक ऋतूनुसार आहारात बदल करणे गरजेचे असते. ऋतूनुसार हवेत दमटपणा , कोरडेपणा, उष्णता, थंडपणा कमी अधिक होत असतो. त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. शरीरातील वात, पित्त, कफ यांच्यामध्ये बदल होऊन त्यानुसार आजार होण्याची शक्यता असते. उदा. पावसाळ्यात हवा दमट असते त्यामुळे सर्दी, खोकला, दमा इ. कफाचे आजार, संधीवात , आमवात इ. वाताचे आजार होतात. 

पण आपण जर ऋतूनुसार आपल्या आहारात बदल केला तर हे आजार होणारच नाहीत किंवा त्यांचे प्रमाण कमी असेल. (सिझनल डाएट) आयुर्वेदात यालाच ऋतुचर्या असे म्हणतात. स्वस्थ राहण्यासाठी या ऋतुचर्येचे पालन करणे जरुरी आहे.
प्रत्येक ऋतूत कसे वागावे , ह्यातील हवामान , आजूबाजूची परिस्थिती, उपलब्ध असणारे पाणी, धान्यपदार्थ , वनस्पती फळे भाज्या, तसेच त्यावेळी शरीरात असणारी वात, पित्त, कफ या तीन दोषांची स्थिती या सर्वांचा विचार करून शरीरातील दोषसाम्य टिकवण्यासाठी त्या ऋतूनुसार आहार ,विहार , व्यायाम , निद्रा इ विचार ऋतुचर्येमध्ये येतो.

हिंदुशास्त्रात सांगितलेले सर्व सण, व्रते यामध्येही शास्त्र व व्यवहार सुसंगती दिसते. उदा. हेमंत ऋतूत दिवाळी येते. व या सणात तेल , तूप , तळलेले पदार्थ , मिठाई खाण्याची प्रथा आहे. या काळात भूक भरपूर लागते. अग्निबल व शरीरबल उत्तम असते. हवा प्रसन्न व निरोगी असते. त्यामुळेच हे सर्व जाड पदार्थ पचतात. पण हे पदार्थ जर आपण वर्षाऋतूत म्हणजे पावसाळ्यात खाल्ले तर पचणार नाहीत.
सध्याच्या नव्या पिढीला हे सणवार आऊटडेटेड वाटतात व त्यामुळे सर्व पदार्थ केंव्हाही खायची सवय लागली आहे. आणि हे पदार्थ बाजारात सतत उपलब्धही असतात. परंतु आरोग्याच्या दृष्टीने हे घटक ठरतात. व त्यामुळेच सारखे डॉक्टरांकडे जावे लागते. म्हणूनच कोणत्या ऋतूमध्ये काय काय खावे व काय वर्ज्य करावे याची खास माहिती ऋतूनुसार येथे देत आहोत.

 

शरद ऋतू:
हवामान : वर्षा ऋतूनंतर शरद ऋतू (सप्टेंबर , ऑक्टोबर ) येतो. पाऊस हळूहळू कमी होत जातो. मध्येच ऊन पडलेले दिसते. हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागते.
दोषविचार : वर्षा ऋतूतील संचित पित्त वाढू लागते. वात कमी होतो. पित्तदोष वाढल्याने रक्तपित्त, कावीळ, डोकेदुखी, इ सारखे आजार होण्याची शक्यता असते.
योग्य आहार : शरद ऋतूमध्ये आहारात गोड, तुरट व कडू रसाचा वापर करावा. आंबट (अपवाद लिंबू , आमसूल (कारण पचनानंतर त्यांचे मधुर रसात परिवर्तन होते.)) कमी खावे. फार गरम जेवण घेऊ नये.
पाणी : साधे थंड पाणी प्यावे. माठातील पाणी प्यावे.
धान्ये : गहू, लाल तांदूळ, ज्वारी , बाजरी , तांदूळ इ धान्ये खावीत.
भाज्या : कोबी , कारले , भेंडी , सुरण , बटाटे , पालक लाल माठ इ. भाज्या खाव्यात.
कडधान्ये : मूग , मटार , चणे , चवळी इ. भाज्या खाव्यात.
मसाले : धने , जीरे , कोथिंबीर यांचा वापर करावा.
फळे : द्राक्षे , आवळा, केळी, जांभूळ , पेरू, सफरचंद , चिकू , डाळिंब , मनुका, अंजीर इ फळे खावीत.
द्रव पदार्थ - दूध , तूप , माठातील थंड पाणी , आवळा , लिंबू सरबत इ. द्रव्य पदार्थांचे सेवन करावे.

पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी पुढील घरगुती उपाय करावेत :

१. कोकम , जिरे , ओवा, साखर , सैंधव यांचे मिश्रण बनवून त्याचे सरबत बनवावे.
२. आवळ्याचा रस, खडीसाखर , थोडासा लिंबाचा रस , जिरे पावडर , चिमूटभर सैंधव पाण्यात एकत्र करून त्याचे सरबत बनवावे ते पित्तशामक असते.
३. लिंबाचा रस, सैंधव मीठ, खडीसाखर, जीरे पावडर यांचे मिश्रण करून सरबत बनवावे.

ऋतू संपता - संपता कोजागिरी पौर्णिमा येते. यातील पिस्ता , काजू ,बदाम , खारीक घालून दूध पिण्याची जी प्रथा आहे. त्यातही पित्ताचे शमन करण्याचा विचार आहे.


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla