Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
आला उन्हाळा तब्येत सांभाळा ...
Health Articles

आला उन्हाळा तब्येत सांभाळा ...

unhala-2014थंडीत कुडकुडायला लावणाऱ्या आणि सर्वांनात हवाहवासा वाटणाऱ्या हिवाळ्याच्या गर्भातून उन्हाळ्याचा जन्म होतो आणि हिवाळ्यात अनुभव घेतलेल्या थंडगार वातावरणाचे जणू उट्टे फेडण्याचं काम उन्हाळा करतो. थंडगार वातावरणाचा आल्हाददायकपणा देणारा हिवाळा संपतो न् संपतो तोच नकोशा वाटणाऱ्या उन्हाळ्यातली रखरखीत उन्हाची काहिली अंगावर येते. उन्हाळा सुरू झाल्याची वर्दी येते आणि सूर्य अक्षरश: आगीचे गोळे फेकू लागतो. सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या मध्यानंतरच उन्हाळ्याचे चटके जाणवू लागतात.

उन्हाळा मनाला जसा त्रासदायक वाटतो तसाच आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही उन्हाळा त्रासदायक ठरू शकतो. उन्हाळा येतानाच मुळी आरोग्याच्या अनेक समस्या आणि विविध आजारांच्या हातात हात घालून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्य सांभाळणे तितकेच आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार उन्हाळा अर्थात ग्रीष्म हा आदानकाळातील सर्वात बलहानी करणारा ऋतू आहे. उन्हाळ्यात सूर्यकिरणे लंबरुप झाल्याने पृथ्वीची उष्णता वाढते. उष्मा वाढल्याने जलीय अंशाचे शोषण होते. पर्यायाने सर्व शरीर धातू क्षीण होतात. यामुळे शरीर श्रान्त (थकलेले) तसेच बलान्त (बलहीन) होते. त्यामुळे अल्पश्रमानेही थकवा जाणवतो. तसेच उन्हाळ्याच्या काळात शरीरातून घामावाटे जीवनावश्यक सोडियम पोटॅशियम, पाणी बाहेर टाकलं जातं आणि जीवनघटकांचा नाश होतो. यामुळे बलक्षय होऊन क्षयरोग, गोवर, कांजण्या, नागिणसारखे विकार होण्याचा धोका निर्माण होतो. विशेषत: शरीरातील जलद्रव्यांचा नाश झाल्याने उष्माघाताचाही धोका संभवतो.
उन्हाळ्याच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सर्वांगाचा दाह होणे, अतिसार, लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. सतत घाम येण्यामुळे शरीराला दुर्गंधी तसेच विविध त्वचारोग होण्याची शक्यता असते. अंगावर घामोळ्या तसेच फोड्या येतात. कडक उन्हात जास्तकाळ काम केल्याने तसेच कडक उन्हात फिरण्याने शरीरात उष्णता वाढते आणि चेहरा तसेच अंगावरची त्वचा लाल किंवा काळसर होते. उष्माघात झाल्यास व्यक्ती मुर्छित होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत निर्माण होणाऱ्या व्याधी आणि त्यावरचे प्रथमोपचार यावर आपण मिमांसा करू.

 

सर्वांगदाह- या व्याधीत संपूर्ण शरीराची आग होते. आणि चेहरा तसेच त्वचा निस्तेज होते. उत्साह कमी होतो. सर्वांगदाहाचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त थंड वातावरणात ठेवावं. एसी तसेच फॅन खाली ठेवावं. उन्हात जास्तकाळ फिरू नये. शरीर वरचेवर थंड पाण्याने पुसून घ्यावं.

उष्माघात- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला ग्लानी तसेच चक्कर येते. डोळ्यासमोर अंधाऱ्या येतात. अशावेळी रुग्णाला थंड वातावरणात शांत झोपवावं. शरीर थंड पाण्यावे पुसून घ्यावं. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीतजास्त द्रव आहार द्यावा. अशा रुग्णांनी कडक उन्हाच्या वेळी घरातून बाहेर पडू नये. तसेच उष्माघात होत असलेल्या रुग्णाला घरात एकटे सोडू नये.
उष्माघाताची लक्षणे
* ताप येतो
* डोके दुखणे
* डोळ्यांची आग
* तहान लागते
घरगुती उपाय
* थंड पाण्याचा वापर
* कांद्याचा रस तळपायाला लावणे
* लिंबू-पाणी अधिकाधिक पिणे
* उन्हात घराबाहेर पडू नये

उष्माघात टाळण्यासाठी...
* डोक्‍यास पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडा
* उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नका
* ताप असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषध घ्या
* टरबूज, कांदा, डांगर यांचा जास्त वापर करा


मुत्राघात- या व्याधीत लघवीला जळजळ होण्याचा त्रास होतो. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे लघवीत उष्णता निर्माण होते. आणि लघवीच्या जागेत दाह होतो. मुत्राघाताचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून तीन ते चार वेळा लिंबू सरबत अवश्य प्यावं. तसेच नारळपाणी, कोकम सरबतही वरचेवर घ्यावं. एक चमचा जिरं-एक चमचा धने ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी हे मिश्रण गाळून घ्यावं आणि त्यात चमचाभर खडीसाखर टाकून प्यावं.
उलट्या-जुलाब- उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं मळमळण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच अतिसाराचाही त्रास होण्याची भीती असते. अशावेळी जास्तीतजास्त द्रवपदार्थ सेवन करावेत. त्याचप्रमाणे एक ग्लास पाण्यात दोन चमचे साखर आणि चिमूटभर मीठ टाकून दिवसातून चार ते पाच वेळा प्यावं. जुलाब होत असतील तर कपभर कोऱ्या चहात अर्ध लिंबू पिळून प्यावं.

त्वचाविकार- उन्हाळ्यातील सूर्याच्या लंबरूप किरणांमुळे त्वचेवर विपरित परिणाम होतात. त्वचा काळसर होते. त्यामुळे घराबाहेर पडताना तोंडाला रुमाल तसेच अंग झाकून ठेवावं. कपडे सैल असतील याची काळजी घ्यावी. बाहेर पडताना आयुर्वेदिक सनस्कीन लोशन लावावं. उष्णतेने शरीरातील रंगद्रव्यावर परिणाम होतो त्यामुळे त्वचा काळवंडते आणि चेहऱ्यावर वांग येतात. त्वचा कोरडी व निस्तेज होते. डोळ्यांना उन्हाच्या झळा लागून डोळ्यांवरही विपरित परिणाम होतात. म्हणून बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा तसेच सनकोट वापरावा. सुती, मुलायम तसेच सौम्य रंगाची अर्था पांढऱ्या रंगाची कपडे वापरावी. पायात घट्ट बूट वापरणे टाळावे. त्वचा कोरडी पडू नये म्हणून उन्हाळ्यात जास्तीतजास्त पाणी प्यावं. तसेच फळांचं जास्तीतजास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध प्रकारच्या फळांचे रस तसेच आहारात काकडीचं प्रमाण वाढवावं. रात्री झोपताना संपूर्ण शरीराला थंड खोबऱ्याच्या तेलाने मालिश करावी. गोवर, कांजण्या आल्या असतील तर त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावं.
juice 1उन्हाळ्यातील आहार- उन्हाळ्यात पचायला हलका व लघु आहार घ्यावा. उन्हाळ्यात वात व पित्तदोषाची वृद्धी होत असते त्यामुळे या काळात वातुळ, पचायला जड, तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावं. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सिताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचं सेवन वाढवावं. तसेच थंड तुपाचाही आहारात समावेश करावा. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्तीत जास्त द्रवाहार करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा. फ्रीजमधलं अतिथंड पाणी पिण्यापेक्षा मटक्यातील सौम्य थंड पाणी प्यावं. लोणी, श्रीखंड, मावा, दही, पनीर, लस्सी शक्यतो टाळावं. मद्यसेवन पूर्ण वर्ज्य करावं.

उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी तसेच सायंकाळी बागेमध्ये गवतावर अनवाणी चालावं. रात्री झोपताना काश्याच्या वाटीने तळपाय चोळावेत. अंघोळीसाठी तसेच वापरासाठी थंड पाणी वापरावे. उन्हाळ्यात शक्य झाल्यास दिवसा थोडी झोप घ्यावी. तयामुळे शारीरिक तसेत मानसिक समाधान मिळतं.

डॉ. कीर्ती ढोबळे
मानसरोवर, नवी मुंबई

PC- Unknown


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla