Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी
Festivals

श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी

shrimahalaxmi vratही पूजा आपण स्वतःही करू शकतो. फक्त ती करताना मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारवून घ्यावी. फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची, त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याच्या सभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत.

स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा. (पितळेचा किंवा तत्सम धातूचाही चालू शकेल.) तो पाण्याने पूर्ण भरावा. एक सुपारी, एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात. पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील, अशा प्रकारे एक नारळ ठेवावा.
हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा. श्रीमहालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिकटवून त्या चित्राची तसबीर समोर येईल अशा तर्‍हेने कलशाला टेकवून ठेवावी.
ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ॐ गोविंदाय नमः । असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी-कुंकू, पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजनाने ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल, ती सफल होण्याची विनंती करावी.
देवीच्या चौरंगावर पाट मांडून त्यावर बसून श्रीमहालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी. नंतर श्रीमहालक्ष्मी माहात्म्य वाचावे. वाचताना किंवा दुसर्‍याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे.
देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्रीमहालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन-अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल, ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी.
रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे.
दुसर्‍या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी-कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण आठ गुरुवार होईपर्यंत श्रीमहालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणार्‍या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दर वर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो.
श्री लक्ष्मीदेवीने पद्‍मपुराणात सांगितले आहे की, जो माझे व्रत नित्य-नेमाने करील, तो सदैव सुखी, समाधानी राहील !
गुरुवार हा श्रीदत्तगुरु-भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे.


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla