Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
नाच गं घुमा, कशी मी नाचू ?
Festivals

नाच गं घुमा, कशी मी नाचू ?

mangalagauriश्रावण महिना आला की, व्रत, वैकल्ये सुरु होतात, श्रावणातील मंगळागौरीची पूजा ही तर स्त्रीयांसाठी आनंदाची पर्वणी असते. नऊवार साडी ,बिंदीपासून जोडवीपर्यंतच्या दागिन्यांनी केलेला साजशृंगार , हातावर खुललेली मेंदी , केसात माळलेला गजरा अशा थाटात ' पिंगा गं पोरी पिंगा.. ' म्हणत मंगळागौर जागवणाऱ्या मुली आजही महाराष्ट्रातल्या बहुतांश घरात दिसतात. श्रावण सुरू झाला की , प्रत्येक मंगळवारी कार्यालय , साभागृह किंवा कधी कधी घरातही हे मंगळागौरीचे खेळ रंगतात. तुम्ही कितीही मॉडर्न असा , कुठल्याही शहरात असा लग्न झाल्यानंतरची पहिली मंगळागौर आजही दणक्यात साजरी होते. या पारंपरिक सणाचं टिकून असलेलं श्रेय जातं ते मंगळागौरीदरम्यान खेळल्या जाणाऱ्या खेळांना. आपल्या पार्ल्यातही असे अनेक ग्रुप आहेत जे मंगळागौरीचे खेळ अतिशय उत्साहात करतात. मंगळागौरीच्या खेळांची आणि पूजा विधींची माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुमच्या कडे खेळ असतील किंवा माहिती असेल तर नक्की आमच्याबरोबर शेर करा.

मंगळागौरीची पूजा

मंगळागौरीची पूजा म्हणजे शंकर-पार्वतीची पूजा. पती-पत्नीमधील प्रेम आणि निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात.

लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. कहाणी तात्पर्याने अशी : सुशीला नावाच्या एका साध्वीस मंगळागौरी प्रसन्न झाली व पुढे तिला वैधव्य प्राप्त झाले असताना मंगळागौरीने यमदूतांशी युद्ध करून तिच्या पतीचे प्राण परत आणले आणि तिला अखंड सौभाग्यवती केले. मंगळागौरीच्या भक्तिपूर्वक केलेल्या पूजेचे हे फल होय. ही कहाणी ऐकल्यावर सुवासिनी हातातील तांदूळ देवीला वाहतात. मंगळागौर पुजलेल्या मुलींनी शक्यतो मौन व्रत धारण करून म्हणजेच मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. पूजेसाठी अन्नपूर्णादेवीची मूर्ती , रोजचे पूजेचे साहित्य , बुक्का , अक्षता , पाच खारका , पाच सुपाऱ्या , पाच बदाम , पाच खोबऱ्याच्या वाट्या , सोळा प्रकारची पत्री (पाने) , दोन वस्त्र , आठ वाती , कापूर , गुलाल , बेल , फुले , दुर्वा , सोळा काडवाती, तुळशीची पाने , केळी किंवा पेरूचा नैवेद्य , पंचामृत , दुधाचा नैवेद्य , जानवे , सोळा विड्याची पाने ,गणपतीसाठी सुपारी , अत्तर , शक्य असल्यास केवड्याचे कणीस , एक नारळ , कापड , हळद-कुंकू या साहित्याची गरज असते. ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी आसपासच्या तसेच नात्यातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवला जातो.

mangalaguari khelजागर आणि मंगळागौरीचे खेळ :
मंगळागौरीचा जागर हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. रात्रीच्या जेवणानंतर विविध खेळ खेळून रात्रभर मंगळागौर जागवली जाते. फुगडी , झिम्मा , गाठोडं , फेर , गोफ , सूप , घागर घुमू दे , खुर्ची का मीर्ची , किस बाई किस , कोंबडा , किकिच पान , दिंडा , सुपारी , काचकिरडा , पकवा , पिंगा हे सर्व मंगळागौरीचे खेळ शारीरिक व्यायामाचं एक उत्तम उदाहरण आहेत. मंगळागौरीच्या या खेळांमध्ये वातावरण प्रसन्न करण्याची ताकदही दिसून येते. दुसरे दिवशी सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो आणि पुन्हा मंगळागौरीची आरती केली जाते. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखे करतात आणि विहीर , तळे , नदी यापैकी कोठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात.

मंगळागौरीच काही गाणी :

1. पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा-
पोरगा गं तुझी पोरगी गं माझी,
पोरगा गं तुझा चकणा
पोरगी गं माझी देखणी

2. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो.
झिम पोरी झिम कपाळाचा भीम
भीम गेला फुटून पोरी आल्या उठून
सरसर गोविंदा येतो. मजवरी गुलाल फेकीतो
या या झिम्मा खेळाया
आमच्या वेण्या घालाया.
एक वेणी मोकळी
सोनाराची साखळी.
घडव घढव रे सोनारा.
माणिकमोत्यांचा लोणारा.
लोणाराशी काढ त्या
आम्ही बहिणी लाडक्या.

3. एक लिंबू झेलू बाई

4. चला चला गं चला सया
चला गं चलाफेर धरू चला
मंगळागौरीचे खेळ खेळू चला
गोल करू चला फेर धरू चला
मंगळागौरीला जागवूया चला


नाच गं घुमा, कशी मी नाचू ?

ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !

ह्या गावचा, त्या गावचा शिंपी न्हाई आला
चोळी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !

ह्या गावचा, त्या गावचा कासार न्हाई आला
बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !

फू बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी !
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट

बारा घरच्या बायका एक जागी मिळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !

लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी
वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !

घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया
नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
घुमु दे घागर घुमु दे !

पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, रात जागिवली पोरी पिंगा !

फेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, झोप चाळिवली पोरी पिंगा !

शालू नेसल्याली भैन माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मागं घालिवली पोरी पिंगा !

भाऊ माझा ग, तो ब राजा ग, अग जा जा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मला बोलिवली पोरी पिंगा !

तुझ्या भावाचं डोळं चकणं ग, रूप हेकणं ग पोरी पिंगा
भैन माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !

तुझ्या भैनीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा
माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !

भाऊ तुझा ग भितो झुरळाला, काळ्या उंदराला पोरी पिंगा
भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !

तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा
अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !

भैन माझी ग जाई बावरून घेई सावरून पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, लुगडं नेशिवलं पोरी पिंगा !


श्री मंगळागौरीची आरती :-

जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।

 


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla