Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
आली दिवाळी….
Festivals

आली दिवाळी….

rangoli3रोषणाईचा आणि लखलखाटांचा सण म्हणजे दिवाळी.... दोन दिवसांवर येऊन ठेपलेला हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोणी फराळ, नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी तर कोणी फटाक्यांच्या खरेदीसाठी वा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडले आहे. बाजरात आलेल्या नवनवीन गोष्टी या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. लख्ख दिव्यांच्या सणात बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी सर्व वस्तूंच्या किमती २०-२५ टक्के वाढलेल्या असल्या तरी विविध वस्तू खरेदी करणाऱ्यांचा उत्साह कमी झालेला नाही. याच काळात बाजारात नवीन आलेल्या व दिवाळीत उपयोगी वा महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींचा या घेतलेला आढावा.• पणत्या आणि सेंटेड मेणबत्या:-

दिवाळीतील लखलखाट देणारी वस्तू म्हणजे पणत्या. दिवाळीतील खरेदी करतानाची महत्वाची वस्तू यात सध्या सेंटेड मेणबत्यांनीही भर घातली आहे. बाजारात धारावी कुंभारवाडा, मस्जिद बंदर, भुलेश्वर येथून पणत्या आल्या आहेत. सध्या बाजारात मेहंदी-भगवा, पिवळा-लाल अशा विविध रंगसंगतीच्या पणत्या, मिणाचे दिवे, विविध आकारातील लामण दिवे, कुंदन, खडे, टिकल्या, चमक्या अशा अनेक विविध कलाकुसरिने घडवलेल्या पणत्या सहज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या पणत्यांच्या जोडीला विविध रंगाच्या सुगंधी मेणबत्या आपण खरेदी करू शकता. विविध सुवासात आणि आकर्षक पद्धतीने तयार केलेल्या या मेणबत्या अनेक दिवस जळू शकतात. अशा या पणत्या व मेणबत्या ५० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

 

• कंदील:-
108 9128दिवाळीत घर सजवण्या विविध वस्तूमध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे “कंदील”. पूर्वी घरोघरी कंदील बनवले जात असे. बांबू, काड्या इत्यादी गोष्टीपासून हे कंदील बनवले जात असे. हल्ली पर्यावरणपूरक कंदीलही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. हे कंदील १६०-३०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, सध्या रेडिमेड कंदिलाची मागणी वाढली आहे. यात प्रामुख्याने चायनीज, फोल्डिंगचे रंगीबेरंगी कंदीले, प्रिंटेड, लोटस कंदील तसेच कापडापासून आणि बांबूपासून तयार केलेले कंदील, काचेचे कंदील छोटे छोटे प्लॅस्टिक कंदील, कलश, देवदितांचे फोटो असलेले कंदील या सर्व प्रकारांचा समावेश आहे. हे रंगीबेरंगी कंदील २०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

• तोरणे:-
सण कोणताही असो गणपती वा दिवाळी दारावर तोरणे ही हमखास बांधली जातात. पूर्वी, झेंडू-डहाळीची तोरणे दरवाजावर लटकवली जायची. परंतु, सध्या याची जागा नकली तोरणे, चायनीज तोरणांनी घेतली आहे. काच, कुंदन आणि गोंडे ची शैली असलेली राजस्थानी तोरणेही बाजारात उपलब्ध आहे. सध्या विविध रंगांचा लख्ख प्रकाश देणारे एलईडी तोरण बाजारात उपलब्ध झाले असून डमरू आणि पणत्यांचा आकार असलेल्या तोरणांची मागणी वाढली आहे. तसेच विविध रेडीमेड फुलांची तोरणे ही उपलब्ध आहेत. एलईडी तोरण ४५० रुपयांपासून उपलब्ध असून डमरू-पणत्यांचे तोरण ७०-१५० रुपयांपर्यंत मिळत आहे. सध्या बाजारात फटाक्यांचा आकार असलेली आणि आवाज करणारी तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. रिमोटचा वापर केल्यानंतर फटका फुटल्याचा आवाज होतो व कचराही होत नाही. याची किंमत २५० रुपयांपासून सुरु आहे. भुलेश्वर, दादर, लालबाग आणि भायखळा मार्केट येथील बाजारात ही तोरणे उपलब्ध आहेत.

• फटाके:-
108 9147दिवाळीत सर्वात महत्वाची गोष्ट फटाके. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांची फटाके फोडण्यास पसंती असते. कोरडे वातावरण असलेल्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातील जळगावात आणि तामिळनाडू येथील शिवकाशी येथे बारमाही फटाके तयार केले जातात. मुंबईतील मस्जिद बंदर महमद अली रोडवरील फटाक्यांची गल्ली तसेच इसाभाई चे दुकान हे फटाक्यांसाठी प्रसिद्ध असून मुंबईत छोटे-मोठे किरकोळ फटाके विक्रेते मोठ्या प्रमाणावर आहेत. फुलबाजा, लवंग, लक्ष्मीबार, भुईचक्र, ताजमहाल, रॉकेटस अशा फटाक्याबरोबर आकाशात उंचावर जाणाऱ्या आणि कमी आवाजाचे चायना फटाके हे सर्वांचे आकर्षण आहे. यावर्षी विशेष फटका म्हणजे मटका अनार. गोल आकारात असलेला पाऊस असून या फटाक्याचे ४ पीस ४५० रुपयांना उपलब्ध आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे सारखे फटाके असून यावर्षी फटाक्याच्या बॉक्सवर सध्याचे प्रसिद्ध सिनेतारका आणि विदेशी मॉडेल्सचे फोटो दिसत आहेत. तसेच बच्चे कंपनी फटक्याकडे आकर्षित होण्यासाठी त्यांच्या आवडीच्या कार्टून्स चित्र आणि नावे फटाक्यांना देण्यात आली आहे.

• रांगोळ्या:-
दिवाळीच्या सणात पणती बरोबर महत्वाचे स्थान असते ते रांगोळीचे. दिवाळीनिमित्त बाजारात रांगोळी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. दादर, लालबाग मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, मस्जिद बंदर मार्केट रांगोळीने सजले आहे. पांढऱ्या दगडांना बारीक करून वा बारीक वाळूला रंग देऊन विविध रंगाच्या रांगोळ्या तयार केल्या जातात. सध्या रेडिमेड कलर रांगोळी मागणी वाढली आहे. या रांगोळीत पांढरी रांगोळी मिक्स करावी लागत नाही. रेडिमेड रांगोळीच्या तुलनेत रांगोळीत भरण्यात येणारे कलर हे महाग आहेत. भाववाढीमुळे सध्या रेडिमेड रांगोळी १५० ते २०० ग्रॅम १६ रुपये, संस्कारभारती रांगोळी ५५ रुपये किमतीला मिळत आहे. तसेच रांगोळ्यांच्या लहान पुड्या १० रुपये पासून उपलब्ध आहे. बाजारात रांगोळीचे स्टीकर मिळत असून छोट्या-मोठ्या आकारात हे रांगोळीचे स्टीकर एकदा लावले कि दिवाळी संपेपर्यंत टेन्शन नाही. हे १० रुपयापासून १०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच रांगोळीची डिजाईन असलेली चाळणी बाजारात विविध आकारात आणि नक्षीत उपलब्ध आहे. या चाळणीवर रंगीत रांगोळी पसरवून चाळणीवरील नक्षी तुम्ही जमिनीवर वा जेथे काढायची आहे तेथे काढू शकता. ५ ते ५० रुपयांपर्यंत रांगोळीची ही चाळणी बाजारात मिळत आहे.

• फराळ:-
दिवाळी सण लखलखटाबरोबर गोडाचा. दिवाळीत फराळाला महत्वाचे स्थान आहे. दिवाळीत पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करून फराळाचा समाचार घेतला जातो. पूर्वी घराघरातून फराळ तयार केला जायचा. परंतु, सध्या नोकरी निमित्त गृहिणी घराबाहेर पडू लागल्या आहेत म्हणून हल्ली रेडीमेड फराळाची जास्त मागणी आहे. घराची चव असणाऱ्या या रेडीमेड फराळ प्रत्येक दुकानात दिसत आहे. त्याचबरोबर मधुमेह आणि हल्लीच्या तरुण वर्गासाठी बाजारात सुगर फ्री आणि डाएट फराळ बाजारात उपलब्ध झाला आहे. डाएट फराळात पदार्थ तळण्याऐवजी बेक केले जातात. सध्या बाजारात बेक करंज्या व शंकरपाळ्या, ऑईल फ्री चकल्या, शुगर फ्री लाडू, डाएट चिवडा उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर या सर्व डाएट फराळाचे बॉक्सही बाजारात आले आहेत.डाएट फराळ महाग असला तरी तो खरेदी करणाऱ्यांचा कल जास्त दिसून येत आहे.

• उटणे:-
दिवाळी म्हटली कि अभ्यंगस्नान आलेच. या स्नानात सर्वात महत्वाचे स्थान म्हणजे उटण्याचे. बाजारात विविध उत्पादनाची उटणे बाजारात उपलब्ध झाली आहेत. मधुकर, बेडेकर, कुबल, मांगल्य यांनी तयार केलेली उटणे बाजारात पाह्यला मिळत आहेत. विशिष्ट सुवासिक पदार्थांपासून तयार केलेल्या लेपात चंदन, आंबेहळद, केशर, गुलाबाच्या पाकळ्या, वाळा, मुलतानी माती इत्यादी घटकांचा वापर केला जातो. हल्ली बाजारात तसेच विविध दुकानामध्ये सुगंधी उटणे, सुगंधी तेल, साबण हे सर्व वस्तू असणारे किट उपलब्ध आहेत. हे किट २०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच उटण्याची पाकिटे २०-२५ रुपयांना मिळत आहे.


- प्रसाद प्रभाकर शिंदे, आरती मुळीक परब

 


muslunkar flash
sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla